सोलापूर - केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतला आहे. या निर्णया विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला असून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज दुपारी सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे या कांदा निर्यातबंदीचा विरोध करत कांदे रस्त्यावर फेकून निदर्शने करण्यात आली. या निर्णयातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देत आहे. ही निर्यात बंदी तत्काळ रद्द करावी, केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेले होते.
देशभरात व महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन लागू केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लहरी मोदी सरकारने अचानकपणे निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली.
हेही वाचा-'राज्यात गरजेपेक्षा 200 मेट्रिक टन जास्त ऑक्सिजन'
सरकारच्या या लहरी धोरणामुळे शेतकरी वर्गात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. कांदा बाहेर देशात पाठवण्यासाठी शेकडो कंटेनर मुंबई पोर्टवर थांबून आहेत. कांदा हे नाशवंत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान होणार आहे. मोदी सरकार किंवा केंद्र सरकारने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
आंदोलनात नगरसेवक मौलाली सय्यद, तौफिक हतुरे,विनोद भोसले, केदार उंबरजे, नलिनी चंदेले, अलका राठोड, आरिफ शेख, हरीश पाटील, राजेश पवार, आंबदास करगुळे, गणेश डोंगरे, गौरव खरात, हेमा चिंचोळकर, जावळे, दिनेश उपासे, तिरुपती परकीपंडला, आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.