पंढरपूर - चंद्रकांत पाटील नावाची गोळी दिवसातून पाचवेळा घेतल्या शिवाय विरोधकांना झोपच लागत नाही, असा टोला भाजप प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे. ते सांगोला येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला, मंगळवेढा येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा-
यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेनेनं धमकीची भाषा वापरू नये, मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे. असल्या धमक्यांना मी कधीही घाबरत नाही. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. कोणतेही सरकार बहुमता शिवाय सत्तेत येत नसते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून जी नम्रता व सेवाभाव असणे गरजेचे होते. ते या सरकारमध्येे दिसून येत नाही. या सरकारची मुख्यमंत्री घरी बसून सरकार चालवतात, सत्ता मिळाली तर त्याचा जनतेसाठी सेवा करण्याऐवजी विरोधकांना संपवण्याची भाषा हे सरकार करत असल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली. मुख्यमंत्री ठाकरे यांची सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीतून विरोधकांवर टीका केली होती. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी हा निशाणा साधला आहे.
दसरा मेळाव्यातील भाषण हे मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते व शिवसेनापक्षप्रमुख म्हणूनही ते भाषण योग्य नव्हते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या शैलीतून भाषण करायचे ते लोकांना आवडायचे, मात्र त्यांनी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जाब विचारणार असा इशाराही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिला.
गणपतराव देशमुखांची घेतली भेट-
मेळाव्या आधी चंद्रकांत पाटील यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांच्या सोलापुरातील सांगोला इथल्या निवासस्थानी ही भेट झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनीही भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे.