पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर शहरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली. पीडित मुलीची आरोग्याची तपासणी केली असता, ही बाब समोर आली. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडत असल्यामुळे सोलापूर येथे सिजर करून त्या मुलीने एका मुलास जन्म दिला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.
मुलीची केली प्रसुती-
मुलीचे वडील बाहेरगावी असतात. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये आई व मुलगी राहतात. मात्र काही दिवसांपासून पिडीत मुलीला त्रास जाणवत होता. त्यानंतर मुलीच्या आईने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता, ती मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर आईने मुलीला तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविले. त्या मुलीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी सिजर करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अल्पवयीन मुलीने दीड किलो वजनाच्या बाळास जन्म दिला आहे. सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये सध्या ती मुलगी उपचार घेत आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर येथे हॉस्पिटलमध्ये मुलीची प्रस्तुती करण्यात आली. पीडित मुलीवर सध्या उपचार चालू आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप पीडित मुलीकडून झालेल्या अत्याचाराविषयीची अधिकची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक जगदाळे करत आहेत.