सोलापूर - शेताच्या बांधावर गांजाच्या झाडांची लागवड करून गांजा विक्री करणाऱ्या मोहोळ तालुक्यातील अनगर येथील शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. दरम्यान, ६५ गांजाची झाडे (वजन ६६ किलो) असा एकूण ६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई (१२ जुलै)रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी हनुमंत धर्मा शिंदे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्याने शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावली होती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी अनगर परिसरात गेले होते. त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची बातमी बातमी मिळाली होती. याबाबत तत्काळ मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील रेल्वे रुळाजवळील हनुमंत शिंदे( वय ५५, रा. अनगर, मोहोळ जि सोलापूर) यांच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी शिंदे याने शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावून त्याची विक्री करत आसल्याचे समोर आले आहे.
मोहोळ पोलिसांनी गांजाची सर्व झाडे जप्त केली
मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ पोलीस अनगर येथे गेले असता, सदर ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीची तब्बल ६५ गांजाची झाडे मिळून आली. त्या झाडांचे वजन ६६ किलो असून तो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किमंत ६ लाख ८५ हजार ५०० आहे. कारवाईनंतर पोलिसांनी गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, गांजाची झाडेही जप्त केली आहेत.
सरकारी पंच घेऊन शेतकरीवर गुन्हा दाखल
सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तहसीलदार जिवन बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व सरकारी पंच उपस्थित होते. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर, कारवाई पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, युसुफ शेख, चंद्रकांत कदम, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी, पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रविद्र बाबर, हरीष थोरात यांच्या पथकाने केली.