सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात पार पडला. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धनचा वसा चालवणाऱ्या संघटनेच्या वतीने राज्यात सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यानुसार मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातही रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी तब्बल ५८ जणांनी रक्तदान करून समाजाप्रति आपले योगदान दिले.
अंकोली गावचे सरपंच संदिप पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोहोळ तालुका प्रतिनिधी विशाल अवताडे यांनी तमाम तालुकावासीयांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून तब्बल ४५८ शिवभक्तांनी या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले होते. त्याला प्रतिसाद देत सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रभर १९ जिल्हात महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच प्रमाणे अंकोली वासीयांनी देखील या आवाहानाला प्रतिसाद देत रक्तदान केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि दुर्गसेवक श्रीधर पाटील, निलेश हारगुडे, ओकांर गोवर्धनकर, आकाश गोडसे, श्रीकांत पवार, दत्ता बाबर, प्रमोद क्षीरसागर, उत्तर सोलापूर तालुका पदाधिकारी गोविंद सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या आणि छत्रपतींच्या 'रयतेचे कल्याण' हा विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला. यंदा रायगडावर राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र शिवरांयाचे रयतेबद्दल असलेल्या विचांराचे पालन करत अंकोलीकरांनी रक्तदान करून शिवरायांना आगळावेगळा मानचा मुजरा अर्पण केला आहे.