पंढरपूर - माळशिरस शहरातील अहिल्यादेवी चौकात भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. भाजपचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते व आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकार हे वीजबिलाच्या माध्यमातून सावकारीचा धंदा करत आहे. माळशिरस तालुक्यामध्ये शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांवर जुलूम करत आहे. शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने चालू करावा, अन्यथा तहसीलदारांच्या गाडीला जनवारे बांधू असा इशार आमदार राम सातपुते यांनी दिला आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. देशमुख यांनी राजीनामा न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी धैर्यशील मोहिते यांनी दिला आहे.