सोलापूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या प्रतिष्ठेच्या लढतीत आज भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीने अध्यक्ष पदासाठी ८ मतांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ४ मतांनी बाजी मारली. समविचारीचे अनिरुद्ध कांबळे अध्यक्षपदी तर दिलीप चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान झाले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हात वर करून ही मतदानाची प्रक्रिया पार पडली.
अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांना जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्याबळाचा आकडा गाठण्यात यश आले. सोलापूर जिल्हा परिषदेत ६८ सदस्य आहेत. त्यापैकी 1 रिक्त अन एक सदस्य तुरुंगात असल्याने ६६ सदस्यांच्या संख्याबळाची ही निवडणूक झाली. बहुमतासाठी ३४ मतांची आवश्यकता होती. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील बडया नेत्यांनी या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवाडीच्यानिमित्ताने गोळाबेरीज करण्यात आपली ताकद लावली होती.
प्रदेश पातळीवरून शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप-आपल्या स्थानिक नेत्यांना जिल्हा परिषद आपल्याकडेच खेचून आणण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या. त्यानुसार, भाजपकडून सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राजेंद्र राऊत, आ. प्रशांत परिचारक, माजी आमदार नारायण पाटील, समाधान आवताडे यांनी तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळीराम साठे, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, माजी आमदार राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप सोपल, उत्तम जानकर यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली होती.
या अध्यक्षपदाच्या जुगाडात समविचारीकडे ३७ संख्याबळ जुळून आले. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला २९ पर्यंतच मजल मारता आली. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात समविचारीला ३५ तर महाविकास आघाडीला ३१ मते मिळाली. अशा रितीने सोलापूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजप पुरस्कृत आघाडीची सत्ता आली आहे. गेल्या निवडणुकीत संजय शिंदे हे सत्तेच्या सारीपाटावरचे वजीर होते. तर, यावेळी मोहिते-पाटील यांच्या रूपाने सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम राहिली आहे. आणि राज्यातल्या राजकारणाचे चाणक्य असणाऱ्या शरद पवारांच्या महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे.
हेही वाचा- सोलापूरमध्ये बनावट विदेशी दारूसाठा जप्त