सोलापूर - पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील चार हुतात्मा पुतळा चौकात भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनात उपस्थिती लावत हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण पत्करावे लागलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत भाजपच्यावतीने दहशतवादाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रात तसेच अनेक राज्यात भाजपचीच सत्ता असताना भाजपच्याच वतीने धरणे आंदोलन कशासाठी? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र, भाजपच्यावतीने आज हे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन कोणत्याही सरकारच्या विरोधात नसून, दहशतवादाच्या विरोधात असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजपच्या या धरणे आंदोलनाला सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, महापालिकेतील सभागृह नेते संजय कोळी, हेमंत पिंगळे, नगरसेविका राजश्री चव्हाण, संगीता जाधव, मनीषा हुच्चे, राज्यश्री पाटील बिराजदार, नागेश वल्याळ, संतोष भोसले, श्रीनिवास करली, श्रीनिवास रिकमले आणि श्रीमंत बंदगर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.