सोलापूर : अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीत 'मी' देव, धर्मापासून लांब राहतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. तसंच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केलंय.
तो शरद पवारांचा प्रश्न : शरद पवार यांनी आस्तिक राहावं, की नास्तिक हा त्यांचं प्रश्न आहे. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी पिढ्यानपिढ्या लोकांनी काम केलं आहे. जगातील सर्वात मोठी दिवाळी 22 जानेवारी रोजी बघायला मिळणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात मला बोलावलं नाही, याला बोलावलं नाही, असं म्हणत बसू नये, असं बावनकुळे यांनी म्हटलंय.
पुण्याचा विकास होणार : पुण्यात जिल्हा नियोजन समितीमधील जवळपास 800 कोटींचा निधी अजित पवार गटाच्या नेत्यांना देण्यात आला आहे. यामुळं पुणे येथील भाजपा, शिवसेना (शिंदे गट)चे नेते आक्रमक झाले आहेत. यावर बावनकुळे यांनी यावर मार्ग निघेल, असं म्हटलंय. शेवटी पुण्याच्या विकासाचा प्रश्न आहे. भाजपा,असो किंवा शिंदे गट असो अन्यथा अजित पवार गट जिल्हा नियोजन समितीचा निधी पुणे जिल्ह्यातच खर्च केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
जरांगे पाटील आरक्षणासाठी वेळ देतील : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. गोळ्या घातल्या, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असं जरांगे यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. आरक्षण देण्यासाठी थोडा वेळ लागेल, मात्र जरांगे पाटील यांनी थोडं समजून घ्याला हवं, असा सल्ला बावनकुळे यांनी जरांगे पाटलांना दिलाय.
राहुल गांधींनी बऱ्याच यात्रा काढल्या : 'भारत न्याय यात्रेवरून' बावनकुळे यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी अशा बऱ्याच यात्रा काढल्या आहेत. त्यांनी हिंदूचा अपमान केला, सावरकरांचा अपमान केला. त्यामुळं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये त्यांचा परिणाम कॉंग्रेसला भोगावा लागलाय.आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक व्यक्ती नरेंद्र मोदी यांनाच मतदान करेल, असा दावा बावनकुळे यांनी केलाय.
हेही वाचा -
शरद पवारांनी स्वीकारलं बच्चू कडूंचं निमंत्रण, बच्चू कडू महाविकास आघाडीत?
राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी संबंध नाही - मनोज जरांगे