सोलापूर - काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? या चर्चेला आता वेग आला आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक दीड लाख मतांनी जिंकणारी भाजप यावेळी मात्र चाचपडताना दिसत आहे. त्यावरून मोदी लाट ओसरली की काय? अशी चर्चा आता शहरात चर्चिली जात आहे.
२०१४ ची निवडणूक १ लाख ४६ हजार मतांनी जिंकणारे विद्यमान खासदार शरद बनसोडे हे पुन्हा एकदा सुशीलकुमारांशी दोन हात करण्यास इच्छुक आहेत. मात्र, स्थानिक पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांनी बनसोडे यांना असहकार्याचा लाल झेंडा दाखवला. मग भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांचे नाव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढे आणले. त्याला शह देण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव पुढे आणले. पण भाजपच्या वरिष्ठ गोटात बनसोडे यांच्या नावाला पसंती आहे. पण स्थानिक राजकारणात त्यांना विरोध होत आहे. म्हणून अमर साबळे आणि महास्वामी यांची चाचपणी केली जात आहे. पण जातीय समीकरणे, बाहेरचा उमेदवार आणि स्थानिक राजकारण या मुद्द्यावरून भाजप बुचकळ्यात पडली आहे. शिवाय शिंदेंना पराभूत करण्याची क्षमता हा मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला जात आहे.
सध्या सोलापुरातल्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण लिंगायत, दलित, आणि मुस्लिम मतांभोवती फिरताना दिसत आहे. त्यात गेले दोन महिने मतदारसंघ पिंजून काढण्यात सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडी मारली आहे. फक्त ऐनवेळी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले तर मात्र शिंदेंची गोची होणार आहे. तूर्तास भाजपचा उमेदवार कोण हा मुद्दा कळीचा ठरतो आहे.