पंढरपूर - मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू आहे. पंचविसाव्या फेरीच्या अखेरपर्यंत भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांना चांगलीच धोबीपछाड दिल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातून भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सुमारे नऊशे मतांची लीड घेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अतिशय कठीण होताना दिसत आहे.
अकराव्या फेरीपासून समाधान आवताडे आघाडीवर..
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात सकाळी साडेआठ वाजता झाली. यामध्ये सर्वात प्रथम पंढरपूर तालुक्यातील कैठाळी या गावापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच समाधान आवताडे यांनी साडेचारशे मतांची आघाडी घेत विजयी वाटचाल सुरु केली. त्यानंतर अकराव्या फेरीपर्यंत कधी समाधान आवताडे तर कधी भगीरथ भालके आघाडीवर दिसून आले. अकरावी फेरीपर्यंत समाधान आवताडे यांनी जवळपास दीड हजार मतांची आघाडी घेतली. 19व्या फेरीपर्यंत सुमारे एक हजार मतांची लीड घेतली होती.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार भारत नाना भालके यांनी तीन टर्म आमदारकी मिळवली होती. मात्र भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातून समाधान आवताडे हे विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यातील भारत नाना भालके यांना मिळणारी आघाडी मात्र भगीरथ भालके यांना पिछाडीवर टाकणारी ठरली आहे. भगीरथ भालके यांना सुमारे एक हजार मतांची पिछाडी पंढरपूर शहर व तालुक्यातील मिळाली आहे. तर आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीमुळे समाधान आवताडे यांचे पंढरपूर शहरात जोरदार मुसंडी मारली आहे.