पंढरपूर (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावातील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जंगलगी व सलगर या गावातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या 309 व 690 पक्षी असे एक हजाराच्या आसपास पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आले. तसेच प्रशासनाकडून शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा बर्ड फ्लू सदृश्य आजारामुळे नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्या कोंबड्यांच्या तपासणीचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला. त्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला आहे. त्यामुळेच आज जंगलगी येथील नदाफ फॉर्ममधील कोंबड्यांची कत्तल करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली व जंगलगीपासून एक किलोमीटर क्षेत्रातील पक्षी, पक्षी खाद्य, अंडी, कोंबडी खत, पोल्टी अनुषंगिक साहित्य देखील शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आल्या. शिवाय जंगलगी गावापासून एक किलोमीटर क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून पोल्ट्री फार्म हाऊसची तपासणी
मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबड्यांची नियमित तपासणी करावी. कोंबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, कुकुट पालकांनी मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुक्कुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी, याबाबतचा कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.