सोलापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून सोलापुरातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने 25 हजार सोलापुरी चादरी आणि 5 टन खाद्य पदार्थ पाठवले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या वतीने ही मदत पाठवण्यात आली आहे. यात गहू, तांदूळ, तेल, डाळ, पिण्याचे पाणी आणि सोलापुरी चादरींचा समावेश आहे. हे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते पूजन करून मार्गस्थ करण्यात आल्या. या शिवाय पूरग्रस्तांच्या बचावासाठी पंढरपूरातील दोन नावा ही पाठवण्यात आल्या आहेत.