माढा (सोलापूर) - तालुक्यातील टेभुर्णी गावातील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्या प्रकरणातील एका आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा बार्शी सत्र न्यायालयाने शुक्रवारी सुनावली आहे. सागर दिपक जगताप (२२) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
3 वर्षापूर्वी केले होते दुष्कर्म -
आरोपी सागर जगताप याने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास टेभुर्णी शहरातील एका ठिकाणी अल्पवयीन पीडित मुलगी ही खेळत असताना आरोपीने तिचे तोंड दाबुन दुष्कर्म केला होता. याबाबत घरी कोणाला सांगितले तर जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडित मुलीच्या पोटात खूप दुखू लागल्याने दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती टेभुर्णी पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर टेभुर्णी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध ३७६(अ,ब), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार घटना घडल्याच्या तीन वर्षानी गुन्हात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड प्रदीप बोचरे, अॅड.दिनेश देशमुख, अॅड. शाम झालटे यांनी बाजू मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, राजेंद्र मगदूम यांनी तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
सर्वोच्च न्यायालयाचे दिले दाखले -
आरोपीने अल्पवयीन मुलीवर अमानुष असे कृत्य केलेले आहे. फिर्यादी व इतर साक्षीदार यांची आरोपी सोबत कोणत्याही प्रकारे पुर्व वैमनस्य नसल्याने खोट्या गुन्हात आरोपीस गुंतवले नाही. ही बाब सरकारी वकिलांनी निदर्शनास आणुन देत सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व आरोपी विरुद्ध आलेला पुरावा याचा विचार करता अतिरिक्त सहाय्यक जिल्हा न्यायाधीश एस.डी.अग्रवाल यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा - धक्कादायक : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या