सोलापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन महत्वाच्या दोन बँकांचे खासगीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशातील व सोलापुरातील सर्व सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस बँक बंद ठेवून विरोध केला आहे. या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. पण, या आंदोलनाचा ऑनलाइन बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही.
जनतेच्या हितासाठी संप
भविष्यात सर्व सरकारी बँकाचे खासगीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, हे खासगीकरण देशाच्या जनतेला अतिशय घातक ठरणार आहे. कारण खासगीकरण झालेल्या बँक जनतेच्या हितासाठी काम करणार नसून स्वतःच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या आहेत. कोणतीही शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जशी सरकारी यंत्रणा काम करते तशी खासगी यंत्रणा काम करत नाही.
एकेकाळी सरकारने बँकांचे राष्ट्रीयकरण केले पण आता मात्र याच बँकांचे खासगीकरण सुरू झाले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी देशातील बँका खासगीकरण करू असे संकेत दिले आहे. पण, भूतकाळात केंद्र सरकारने 1969 साली व 1980 साली अनेक खासगी बँकाचे राष्ट्रीयकरण करून बँका खेड्यापर्यंत पोहोचवल्या. सर्व सामान्य जनतेला बँकांचा मोठा फायदा झाला. पण, या खासगीकरणमुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 430 बँका बंद असल्याने पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प
सोलापूर जिल्ह्यातील सर्व 430 सरकारी बँक शाखा दोन दिवस बंद आहेत. या संपात सोलापूर जिल्ह्यातील जवळपास तीन हजार बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. दोन दिवस बँका बंद असल्याने पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ऑनलाइन बँकिंग व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. पण, सरकारने हा खासगीकरणचा निर्णय मागे न घेतल्यास अनिश्चित काळासाठी बँका बंद ठेवून आंदोलन करू, असा इशारा देखील बँक युनियन संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्ते यांनी यावेळी बोलताना दिला.
हेही वाचा - वीज बिल माफीसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन
हेही वाचा - सोलापूर; कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई; १३ लाख रुपयांचा दंड वसूल