सोलापूर- कोरोना प्रतिबंधासाठी बालाजी अमाईन्सकडून सोलापूर शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि साहित्याची मदत करण्यात आली आहे. कंपनीकडून 2 अत्याधूनिक व्हेटिंलेटर, 100 पीपीई कीट आणि एक हजार एन 95 मास्कसह इतर साहित्य देण्यात आले आहे.
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू महामारीच्या प्रतिबंधासाठी बालाजी अमाईन्सने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मदत यंत्रणा राबवली आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास रेसमेड आणि बी एम सी बिलेव्हल कंपनीचे २ अद्ययावत व्हेंटिलेटर, १०० पीपीई किट, १ हजार एन ९५ मास्क व १२५ लिटर सॅनिटायझर हे साहित्य दिले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे हे सुपूर्द केले.
आजपर्यंत कंपनीने केंद्र, महाराष्ट्र राज्य आणि तेलंगणा राज्यास ८५ लाखांची मदत केली आहे. तर, याव्यतिरिक्त उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पिटलला अद्ययावत व्हेंटिलेटर, PPE किट, एन ९५ मास्क, सॅनिटायझर व निर्जंतुकिकरण औषध सोडियम हायपोक्लोराईट पुरविले आहे. तसेच पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना संसर्गापासून वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर हे साहित्य पुरविले आहे.
![बालाजी अमाईन्सकडून वैद्यकीय साहित्याची मदत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-balaji-amines-help-7201168_10042020105627_1004f_1586496387_488.jpg)
कंपनीने शासकीय रुग्णालयास आणखीन एक ओरिओन जी कंपनीचे व्हेंटिलेटर देण्याचे नियोजन केले असून येत्या दोन दिवसात ते रुग्णालयास सोपविण्यात येईल, असे राम रेड्डी यांनी सांगितले. अशा कठीण काळात बालाजी अमाईन्स शासन व गरजूंना शक्य ती मदत करणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक रेड्डी यांनी सांगितले.