सोलापूर - पुढची पाचही वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच हस्ते पुढची पाचही वर्षे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होईल, असा विश्वास विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांना येता आले नाही, यावेळी साहेब आल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचेही भोसले म्हणाले.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला आहे.
१०० कोटी खर्चून संत विद्यापीठाची स्थापना होणार
पुढच्या वर्षी २० मार्च २०२० ला मंदिर समितीचे उत्पन्न हे ५० कोटींवर झालेले असेल असेही अतुल भोसले यावेळी म्हणाले. संत विद्यापीठाचा मोठा प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संत विद्यापीठाचा प्रकल्प हा १०० कोटींचा आहे. त्यासाठी शिर्डी देवस्थानचे प्रमुख हावरे यासाठी मदत करणार असल्याचेही भोसलेंनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प येणाऱ्या काळात राज्याला दिशा देण्याचे काम करेल, तसेच सांस्कृतिक ठेवा जतन करेल असेही भोसले यावेळी म्हणाले.