माळशिरस - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे व कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. अवैधरित्या चालू असणाऱ्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी वेळापूर पोलीस पथक गेले होते. यावेळी 20 ते 25 जणांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला
पुणे-पंढरपूर महामार्गावर वेळापूर येथे पालखी चौक परिसरात पारधी समाजाची वस्ती आहे. त्या वस्तीवर अवैधरित्या हातभट्टी दारूची विक्री करण्यात येत होती. ही हातभट्टी गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. या हातभट्टीवर अद्यापही कोणत्याही पोलीस पथकाने कारवाई केली नव्हती. मात्र, या ठिकाणी अवैधरित दारू निर्माण करून विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भगवान खरतडे व अन्य दोन पोलीस कॉन्स्टेबल अड्ड्यावर चौकशी करत होते. यावेळी पारधी वस्तीवरील 20 ते 25 महिल व पुरुषांच्या टोळक्याने थेट पोलीस पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पोलिसांनी प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, हा जमाव 3 पोलिसांच्या आवाक्याबाहेर होता. या हल्ल्यात 2 पोलीस गंभीर जखमी झाले. तर 1 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.
पोलीस निरीक्षकांसह 2 पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू
जमावाच्या या प्राणघातक हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान घोरपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना वेळापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली.
अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही
वेळापूर पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे सोलापूर पोलीस खात्यामध्ये मोठी खळबळ उढाली आहे. हा हल्ला करणाऱ्या जमावाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ग्रामीण पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जाणार आहे. पोलीस निरीक्षकांवर हल्ला झाल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे.
हेही वाचा - उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू, 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले