सोलापूर : आषाढी एकादशीचा सोळा अवघ्या काही तासांवर आला आहे. सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूर जवळ दाखल झाल्या आहेत. मंगळवारी बाजीराव विहीर येथील गोल रिंगण संपल्यानंतर रात्री सर्व पालख्या वाखरी येथील पालखीतळावरती विसावल्या होत्या. वाखरी येथे सर्व पालख्यांचा रात्री शेवटचा मुक्काम होता. आज सकाळच्या सुमारास सर्व भाविकांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सर्व पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ : वाखरी येथील पालखी तळावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सोपान काका यांच्या एकत्रित पालख्या काल रात्री मुक्कामास आल्या होत्या. या सर्व पालख्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्याने, पंढरपूर शहरांमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यास दहा ते बारा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने वाखरीचा पालखीतळ 65 एकर परिसर तसेच बावन एकर परिसर या ठिकाणी भाविकांच्या राहण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर दिंडीतील वाहनांची व्यवस्थाही पंढरपूरच्या बाहेर आठ ते दहा किलोमीटरवर करण्यात आली आहे.
पंढरीनगरी भाविकांनी गजबजली : आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असून, मंदिर परिसर देखील भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. पंढरपूर शहरामध्ये नदीपात्र, दर्शन रांग, ६५ एकर परिसर, वाखरीतळ या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणामार्ग, परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेतील भाविकांना समितीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच दर्शन रांगेचे पाहणी केली. वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेचा आढावा प्रत्यक्ष दर्शन रांगेमध्ये जाऊन घेतला आहे. आषाढी एकादशीची पूर्वतयारीची पाहणी करणारे एकनाथ शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर डिजिटल फलक लावण्यात आले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांचे फलक लावण्यापेक्षा वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा असे आदेश दिले. त्यावेळी पंढरपुरातील मुख्य रस्त्यावरील सर्व डिजिटल फलक काढण्यात आले. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.
हेही वाचा -