सोलापूर पंढरपूर : वारकरी संप्रदायामध्ये वासुदेव भारुड, काकडा हा या संप्रदायाचा पाया असतो. पूर्वीच्या काळी लोकसुद्धा ते सर्व नित्य नेमाने करत होते. कालांतराने जग आधुनिक होत गेले. वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे आजही वारीसारखा सोहळा होत आहे. त्याच पद्धतीने वासुदेवसुद्धा वारीमध्ये सहभागी होतात.
संस्कृती लोप पावत आहे : वासुदेवाचा पोशाख हा आकर्षणाचा विषय असतो. त्याचबरोबर सकाळी लोकांना जागे करायचे काम हे वासुदेव हे आध्यत्मिक प्रबोधन करून करतात. खरंतर ही संस्कृती टिकवली पाहिजे. पण दिवसेंदिवस ती लोप पावत आहे. पूर्वी गावागावात असणारे वासुदेव आता मात्र बोटावर मोजण्याइतके राहिले आहेत. असे असले तरी दरवर्षी वारी आणि आळंदी या ठिकाणी हे वासुदेव येऊन सेवा करत असतात. त्यांच्याशी संवाद साधला असता, वासुदेव म्हणाले की, आम्ही आहोत तोपर्यंत ही संस्कृती ही टिकेल. आम्ही सगळे परंपरा म्हणून शिकत आलो आहे. संस्कृती टिकवली आहे. यापुढे ही सगळी संस्कृती टिकेल का नाही आता सांगता येणार नाही. कारण तरुण मुले याकडे पाहताना हा भिकाऱ्याचा धंदा आहे, या दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे या सांस्कृतिक कलेला आता राजकीय अधिष्ठान देणे गरजेचे आहे. अशी भावना वासुदेवाने बोलताना व्यक्त केली आहे.
शासनाने मदत करावी : पंढरपुरामध्ये दर आषाढीला वैष्णवांचा मेळा भरतो. चंद्रभागेच्या तिरी हे असे सगळे वासुदेव आपली कला सादर करत. अध्यात्माचा गजर करत, या ठिकाणी वासुदेव पाहायला मिळतो. मात्र महाराष्ट्रात ही कला लोप पावत असल्याचे चित्र आहे. आमची ही आता शेवटची पिढी असून पुढच्या पिढीला ही कला पाहायला मिळेल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही. असे वासुदेवाने सांगितले आहे. समाज प्रबोधन करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी वासुदेव भारुड, गवळणी अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्व उभे केले. त्या व्यक्तिमत्त्वाला चांगले आध्यात्मिक अधिष्ठान सुद्धा दिले होते. त्यामुळे ज्याप्रमाणे वारी टिकली त्याचप्रमाणे वासुदेव सुद्धा टिकणे हे गरजेचे आहे. त्यासाठी समाज आणि शासनाने मदत करावी. आपल्या कलेच्या माध्यमातून हे वासुदेव पांडुरंगाचे मोहक रूप, पांडुरंगाच्या भक्तीचे रूप आणि पांडुरंगाला भेटण्यासाठी आलेल्या भक्तांचे वर्णन आपल्या कलेतून करत असतात. यापुढे राज्य शासनाने आम्हाला मदतीचा हात द्यावा. अशी मागणी या वासुदेवाने केलेली आहे.
हेही वाचा-
- Ashadhi Ekadashi 2023 वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन
- Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
- Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी