बार्शी (सोलापूर) शहरातील वाणी प्लॉट येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून, 4 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. आरडाओरड केली तरी पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत, बार्शी शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचाराच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरांकडे शस्त्र असल्याने, घरात सर्व सदस्य असतानाही कोणीच काही करू शकले नाही. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास
शहरातील वाणी प्लॉट येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजेंद्र घेणा जाधव (68) यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे जाधव कुटुंबातील सर्व सदस्य हे जेवण करून झोपले होते. दरम्यान, रात्री 12 च्या सुमारास हॉलमध्ये झोपलेल्या गजेंद्र जाधव यांना जाग आली. त्यांच्यासमोरच दोन व्यक्ती हे हातामध्ये चाकू आणि दांडा घेऊन उभा होते. तर अन्य एका व्यक्तीच्या हातात बॅटरी होती. आरडाओरड केली तर तुमच्या पत्नीला जीवे मारू अशी धमकी चोरट्यांनी गजेंद्र जाधव यांना दिली. त्यानंतर त्यांनी कपटाचे लॉक उघडून सोने, मोबाईल आणि रोख रकमेसह 4 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास केला. अंदाजे 20 ते 25 वयोगटातील हे चार चोर असल्याचे जाधव यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - नाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू; स्थानिकांनी लावला हलगर्जीपणाचा आरोप