पंढरपूर - कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक भयानक आहे. दुसऱ्या लाटेमध्ये प्रौढ नागरिकांबरोबर बालकांनाही फटका बसला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधित झालेल्यात शहरात 587 तर ग्रामीण भागात केवळ 37 लहान मुले आहेत. 0 ते 15 वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे कोरोनाला हरवत आहेत. मात्र, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलांना कोरोना लागण होण्याची आकडेवारी तुलनेत कमीच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पहिल्या लाटेत 927 बालकांना कोरोना लागण -
सोलापूर जिल्ह्यात पहिल्या लाटेतील कोरोना विषाणूने सर्वात शेवटी प्रवेश केला होता. त्यानंतर कोरोनाने सोलापूर शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घातला होता. पहिल्या कोरोना लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात 928 बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. गतवर्षी शहरात 889 तर ग्रामीण भागात 28 मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. यंदा संख्या वाढली असली तरी ती सरासरी रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये 624 बालकांना कोरोना -
दुसऱ्या लाटेमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाचे बळी अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी शहरी व ग्रामीण भागात 624 बाल बालके कोरोना बाधित झाली आहेत, त्यामध्ये शहरी भागात ग्रामीणपेक्षा प्रमाण जास्त आहे. शहरी भागात 587 तर ग्रामीण भागात केवळ 37 लहान मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात अनेक बाल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
नागरिकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी -
नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यताही कमी प्रमाणात आहे. जिल्ह्यातील शाळा सध्या बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर सोडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या बाल विभागाकडून करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.