सोलापूर - महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात लावण्यात आलेले डिजिटल फ्लेक्स हटवलेआहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. ही महा जनादेश यात्रा मराठवाड्यातून सोलापुरात येत असून उद्या सोलापुरात या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी सदर नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र हे फ्लेक्स लावले होते.
नो डिजिटल झोनमध्येही फ्लेक्स लावण्यात आले होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पालिका आयुक्त दीपक तावरे यांना फोन करून या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस संरक्षणात ही कारवाई केली.