सोलापूर - पंढरीचे श्री विठ्ठल मंदिर हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे आणि सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरही बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये देवाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे एकमेकांच्या सहवासात आल्यावर त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे मंदिरात गर्दी होऊ नये आणि या रोगाच्या प्रतिबंधासाठी मंदिर बंद करण्याच्या निर्णयासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक बोलवली होती. विठ्ठल रुख्मीणी मंदिर समिती, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर आणि सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केल्यानंतर ही मंदिर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.