पंढरपूर (सोलापूर) - गेल्या आठवड्यात पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने विस्थापित नगर येथे अतिक्रमण केलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली होती. नागरिकांना कोणतीही सूचना न देता हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्यावतीने करण्यात आला होता. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नगरपालिकेविरोधात मोठा अक्रोश होता. आज या अतिक्रमणधारकांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नागरिकांना अल्प किमतीमध्ये घरे दिली जाईल तसेच मर्चंन्ट बँकेकडून या योजनेमध्ये घरे घेणाऱ्या नागरिकांना कर्ज मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
हेही वाचा - 'लढायचं असेल तर राजकीय मार्गानं लढा, ईडीच्या माध्यमातून नको'