सोलापूर - बुधवारी सायंकाळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावरील दगडफेकीच्या घटनेनंतर पडळकर समर्थकांत तीव्र नाराजी पसरली होती. शासकीय विश्रामगृहात पडळकर समर्थकांनी दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांविरोधात घोषणाबाजी करून शासकीय विश्रामगृह परिसर दणाणून सोडला. गोपीचंद पडळकर समर्थकांनी काही वेळानंतर पोलीस आयुक्तालय गाठले आणि दगडफेक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि ताबडतोब त्यांना अटक करा अशी मागणी करत पोलीस आयुक्त मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आश्वासनानंतर तब्बल दोन तासानंतर आंदोलन मागे घेऊन पडळकर समर्थक घरी परतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू -
मड्डी वस्ती येथे गोपीचंद पडळकर यांच्या वाहनांवर मोठेमोठे दगड फेकण्यात आले होती. यामध्ये पडळकर यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण पडळकर समर्थकांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे कार्यालयात आले आणि सर्व माहिती जाणून घेतली. आंदोलन करणाऱ्या शिष्टमंडळाची विंनती ऐकून घेतली आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून समाजकंटकांचा शोध सुरू करू असे आश्वासन दिले. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
संचारबंदीची ऐसी की तैसी -
सोलापूर शहरात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण संचारबंदीचे सर्व नियम धाब्यावर बसवून गोपीचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक सोलापुरात दिवसभर घोंगडी बैठका घेत फिरत होते. त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर संचारबंदीमध्येच पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जवळपास 11 वाजेपर्यंत सुरू होते. सोशल डिस्टन्सचे पालन कोणीही करत नव्हते.