सोलापूर- शहरापासून जवळच असलेल्या विडी घरकुल परिसरात कोरोना प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या एकत्रित नियोजनानुसार कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले आहे. मागील आठ दिवसात विडी घरकूल परिसरातील कोरोनाची संख्या ही शून्यावर आली असून एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. कोरोनावर काम करणाऱ्या यंत्रणाना नागरिकांची साथ मिळाली तर कोरोनाची साखळी तोडण्यात यश येते, याची प्रचिती सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या विडी घरकुल या वसाहतीमध्ये आली आहे. 65 हजार लोकसंख्या असलेल्या विडी घरकुल परिसरात मागील आठ दिवसापासून एकही रुग्ण आढळलेला नाही.
प्रशासनाने विडी घरकुल या ठिकाणी योग्य नियोजन, त्वरित उपचार आणि विलगीकरणाचा पॅटर्न राबविल्याने आठ दिवसापासून रुग्ण सापडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. विडी घरकुल शहराच्या जवळ असल्याने रूग्ण झपाट्याने वाढण्याची भीती प्रशासनाला होती.
28 मे 2020 रोजी पहिला रुग्ण सापडल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम केले. विडी घरकुल परिसरात एकही शासकीय दवाखाना नाही. शासकीय दवाखाना नसल्याने आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिक क्लिनिक आणि फिव्हर क्लिनिक सुरू केले. लोकप्रतिनिधींच्या मदतीने नागरिकांना विश्वासात घेण्यात आले. जनजागृतीमुळे घरकुलमधील काही तरूण मदतीसाठी पुढे आले. नागरिकांच्यात जनजागृती करणे, त्यांच्या हालचाली टिपणे, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, अशी कामे 175 कोविड वॉरियर्सनी केली.प्रशासनाने 175 जणांची कोविड वॉरियर्सची नेमणूक केली होती. या कोविड वॉरियर्सनी रेशन दुकाने, मोबाईल एटीएम, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला. नागरिकांना घरातच सुविधा मिळाल्यामुळे लोकांचा घराच्या बाहेरील वावर कमी झाला.
आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने इथल्या नागरिकांचा कंटेनमेंट झोनचा संपर्क तोडण्यास मदत केली. विडी घरकुल परिसरातील 12 हजार कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी 100 टीम तयार करण्यात आल्या होत्या. 100 टीमद्वारे 12 हजार घरातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ज्यांना त्रास होत आहे अशा रुग्णांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले.
विडी घरकुल भागातील 40 पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांमधील 38 रग्ण बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा मृत्यू हा अपघातात झाला तर तर दूसऱ्या पेशेंटला पोटाचा कॅन्सर होता. इतर 38 जण हे कोरोनातून बरे झाले आहेत आणि कोरोना बाधितांची संख्या ही शून्यावर आली आहे.