सोलापूर - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील चारा छावण्यावरील शेतकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना मदतीला धावून येते हा इतिहास आहे. त्यामुळेच राजकारण आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ज्या-ज्या वेळी अडचण निर्माण होईल. त्यावेळी शिवसेना आपल्या मदतीला येईल, असा शब्द यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही आणी शिवसेना ते करत नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, तुम्ही कोणत्याही जाती किंवा धर्माचे असा मदत करणे हा शिवसेनेचा प्रांत आहे, आणि आम्ही ती करणारच असेही ठाकरे म्हणाले.
राज्यातील दुष्काळी चारा छावण्यातील शेतकरी बांधवांसाठी शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कमलापूर गोडसे वाडी येथील चारा छावणीला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
चारा छावणीतील जनावरे आणि शेतकरी आपल्या घरी जात नाहीत, तोपर्यंत छावतीत जेवणाचे नियोजन केले जाईल. शेतकऱ्यांना कुठल्याही अडचण असल्यास शिवसेनेला फक्त हाक द्या, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना अवाहन केले. गोडसेवाडी येथील चारा छावणीस भेट देऊन त्यांनी पशुपालकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी आमदार तानाजी सावंत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, महिला जिल्हा प्रमुख शैला गोडसे, आमदार नारायण पाटील, शहाजी बापु पाटील, श्रीकांत देशमुख, मधुकर बनसोडे, कमरूददीन खतीब यांच्या सह तालुक्यातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.