सोलापूर - सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपीची विचारपूस करताना कोठडीत त्याचा मृत्यू ( Solapur Police Custody Accused Dies Case ) झाला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास हा सीआयडी कडून करण्यात येत आहे.
सोलापूर पोलिसांवर गुन्हा दाखल - चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या पारधी समाजातील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 3 ऑक्टोबर 2021 रोजी रविवारी रात्री सातच्या सुमारास मृत्यू झाला होता. भीमा काळे (रा. कुर्डूवाडी,जि सोलापूर) असे मयत आरोपीचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सात मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर सोलापुरात पारधी समाजातील नागरिकांनी मोठे जन आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेनंतर भीमा काळे याच्या मृत्यु प्रकरणी सीआयडीकडे तपास देण्यात आला होता. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी 21 एप्रिल 2022 रोजी तपास पूर्ण करून विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह श्यामराव पाटील, एपीआय शितलकुमार कोल्हाळ, पोलीस कॉन्स्टेबल श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे, पोलीस नाईक अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई अतिष काकासाहेब पाटील,पोलीस नाईक लक्ष्मण पोमु राठोड यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे सविस्तर प्रकरण -
भीमा काळेस कारागृहातुन ताब्यात घेतले होते - सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भीमा काळे या विरोधात भादवि ३९५, भादवि ४५४,४५७,३८० असे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल होते. भिमा रज्जा काळे, (वय ४२ वर्षे, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हा वेगवेगळ्या गुन्ह्यात सोलापूरच्या कारागृहात कैद होता. न्यायालयाची परवानगी घेऊन २२ सप्टेंबर २०२१ येथून एपीआय कोल्हाळ यांनी जिल्हा कारागृह सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. न्यायालयाने २२सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती.
पोलीस कोठडीतुन थेट रुग्णालयात ऍडमिट केले - पोलीस कोठडीत असताना भीमा काळे यास सर्दी, ताप, खोकला व उलटया होत होत्या. अशी नोंद सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. व दोन्ही पायास संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजले होते. सिव्हील हॉस्पीटल येथे २४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी 2.25 वा मेडीकल यादीसह तत्कालीन एपीआय कोल्हाळ यांनी उपचारास दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना संशयीत आरोपी भिमा रज्जा काळे हा 3 ऑक्टोबर 2021 रोजी पावणे नऊ च्या दरम्यान मयत झाला.
पोलीस कोठडीत मारहाण - सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार पोलीस कोठडीत अटक असलेला संशयीत आरोपी भिमा रज्जा काळे याने गुन्हा कबुल करावा व गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल काढुन द्यावा म्हणून त्यास गुन्ह्याचे तत्कालीन तपासी अधिकारी एपीआय कोल्हाळ, पोहवा श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डम, पोशि अतिश काकासाहेब पाटील, व पोना लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कोठडीतील संशयीत आरोपी भीमा काळे यास मारहाण केली होती.
पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका सीआयडीने ठेवला - विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव यांनी एपीआय कोल्हाळ यांना गुन्हयाच्या तपासामध्ये मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. तसेच दि. २२सप्टेंबर २०२१ रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास, संशयीत आरोपी भिमा काळे यास विजापूर नाकापोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पीआय उदयसिंह पाटील यांसमोर हजर केले. त्यावेळी संशयीत आरोपी लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास आले. तरी देखील आरोपीस वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असताना सुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
पोलीस कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरेच नाही - सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याचे छायाचित्रण जतन करण्याचे प्रशाकीय जबाबदारी पोलिसांवर आहे.परंतु ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ही जबाबदारी टाळली . विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे असणे आवश्यक असताना सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाही.
आजारी असताना पोलीस कोठडीत मारहाण - भा.द.वि.395 मधील संशयीत आरोपी भिमा काळे यास मारहाण केली होती. तसेच झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मयत भीमा काळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहित असतानाही त्याला वैद्यकीय गरज होती. आजारपण व झालेल्या मारहाणीमुळे जखमांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. संशयीत आरोपीस तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्युस कारणीभुत झाल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भा.द.वि. 304, 330, 166, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सीआयडीचे डीवायएसपी जी. व्ही. दिघावकर करत आहेत.
हेही वाचा - Lalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन