पंढरपुर (सोलापूर) - खुनातील एका आरोपीला आज (रविवार) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलीस असताना आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
शिवाजी नाथाजी भोसले (वय 57, रा. तिसंगी, ता. पंढरपूर) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास शौचालयाला गेल्यावर या आरोपीने खिडकीचे गज तोडून तेथून पलायन केले.
शिवाजी भोसले हा 2016च्या खून प्रकरणातील आरोपी आहे. त्याला 2016पासून पंढरपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे त्याच्या छातीत दुखत असल्यामुळे पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शौचालयाच्या बहाण्याने खिडकीतून त्याने पलायन केले. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली.