सोलापूर- आषाढी वारी कशा पद्धतीने काढायची, याचा कोणताही निर्णय शुक्रवारच्या बैठकीत झालेला नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी एक बैठक बोलावण्यात येईल आणि पूढच्या महिन्यातील बैठकीमध्ये आषाढी वारीचा निर्णय होईल, अशी माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काढण्याची भूमिका काही महाराज मंडळीनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पालखी प्रमुखांच्या बैठकीमध्ये आषाढी वारीची परंपरा खंडीत होऊ देणार नाही. शासनाचे आदेश पाळू पण आषाढी वारी काढू, अशी भूमिका ठराविक महाराज मंडळीनी घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आषाढी वारी संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे चेत्री यात्रा रद्द करण्यात आलेली होती. मात्र, येणारी आषाढी वारी काढण्याची भूमिका काही महाराज मंडळीकडून घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची देखील भूमिका अत्यंत महत्वाची आहे.