पंढरपूर - मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे ट्रक व चार चाकीचा समोरासमोरील भीषण अपघात एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यात सुनील वाघमारे (वय 31 रा. टिळक नगर सोलापूर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दोघा जणांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे वाहन क्रमांक (एमएच 13 डिटी 1819) या चारचाकी वाहनाने सांगोला येथे गेले होते. संगोला येथील काम संपवून ते सांगोला येथून सोलापूरला निघाले होते. मध्यरात्री १ वाजता यांचे वाहन मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपूर येथे एसबीआय बँकेसमोर आले असता समोरून येणारा ट्रक (एमच 13 डीक्यू 1270) याने यांच्या वाहनाला समोरून धडक दिली. धडक देऊन वाहन चालक पळून गेला आहे. या धडकेत सुनील वाघमारे हे मृत झाले असून गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी हर्षा कुमार कांबळे यांनी कामती पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.