सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी गोंधळ निर्माण झाला होता. सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आज (मंगळवार) कार्यालय आवारातील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी हे कृत्य थांबवण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
इब्राहिम मुलाणी (रा. मौजे उमरे पागे, पंढरपूर) असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आज दुपारी १२ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकऱ्याच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे प्रहार संघटनेचा पाठिंबा होता. शेतकरी ज्यावेळी आंदोलन सुरू करत होता, त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाने टॉवरवर चढून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी शासकीय शिपायास अर्वाच्य भाषेत खाली येण्यास सांगून त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
ही घटना उपस्थित असलेल्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत प्रहारच्या कार्यकर्त्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. शेतकऱ्याला सदर बझार पोलीस ठाण्यात आणून त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणावर पोलिसांची भूमिका काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जखमी शिपायाने देखील आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता, मात्र हे प्रकरण मिटवण्यात आल्याची देखील चर्चा सुरू होती.
हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्याने सरपंचाच्या मुलाचा तलवारीने खुनी हल्ला