सोलापूर - गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांची जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी अखेर सुटका केली आहे. गेल्या २ वर्षांपासून या नऊ जणांना सोलापूर जिल्ह्यातील बाधलेवाडी या ठिकाणी ऊस तोड मुकादमासह त्याच्या सासऱ्याने बंधक करून ठेवले होते. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने सुटका -
जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी ऊस तोड मुकादम भरत आलदार आणि डिगांबर माने या बंधक बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सोलापूर पोलीस करणार आहेत.
हेही वाचा - अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला हातोडा..पाहा व्हिडिओ
अशी करण्यात आली सुटका?
दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने मरिया घुले त्यांच्या आई आणि मुलगी यांनी दवाखान्यात न जाता थेट जालना गाठले. तेथील काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांना या प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी या महिलेला कदीम जालना पोलिसांकडे पाठवले. या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांनी तातडीने एक पथक सोलापूरकडे रवाना करून मारीया यांच्या कुटुंबातील सर्वांची सुटका केली. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी उधळलेली मुक्ताफळे दुर्दैवी - खासदार सुनील तटकरे