पंढरपूर (सोलापूर) - तालुक्यात एमआयटी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णांलय पंढरपूर आणि जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे 263 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यात 45 जणांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने 10 दिवस पूर्ण उपचार देऊन त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. तर दिवसभरात शहर व तालुक्यात 33 जणांना कोरोनाची लागण झाली.
ग्रामीण व शहरी भागातील 45 रुग्णांनी मंगळवारी कोरोनावर मात केली आहे. प्रशासनाकडून या सर्वांचे टाळ्यांनी व फुलांनी स्वागत करण्यात आले. तालुक्यात दिवसभरात ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पंढरीत कोरोना बाधितांची संख्या 465 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 195 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 7 जणाचा कोरोनामुळे मुत्यूही झाला आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यात आयसीएमआरच्या नियमानुसार जनकल्याण हॉस्पिटल काम करत आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून अती कोरोना संसर्गजन्य नागरिकांना सेवा देण्याचे काम करत आहे. आता सध्या जनकल्याण हॉस्पिटलमधे 13 अती संसर्गजन्य रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील काही रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती माहिती डॉ. अजित जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
कोरोनामुक्त झालेल्या 45 जणांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.