सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे यासाठी एसटी महामंडळाने संपूर्ण राज्यभरातून 3 हजार 724 जादा बसेस पंढरपूरला पाठवण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण राज्यभरातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाकडून नियमीत बसेस पेक्षा 3 हजार 724 जादा बसेस आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.
एसटी बसेस सोबतच रेल्वेकडूनही आषाढी एकादशीनिमित्त सात विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती- पंढरपूर -अमरावती रेल्वे गाडी 2 वेळा. तसेच पंढरपूर- कुर्डूवाडी- पंढरपूर, लातूर- पंढरपूर, मिरज- पंढरपूर - मिरज आणि कुर्डूवाडी- पंढरपूर या विशेष रेल्वे आषाढी एकादशीनिमित्त सोडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रासह देशभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. पायी वारी व्यतिरिक्त एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या या लाखो भाविकांची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने 3 हजार 724 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरसाठी ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्यावतीने जवळपास पाच हजार चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी हे पंढरपुर येथे असणार आहेत. 10 जुलै ते 16 जुलै या कालावधीमध्ये हा सर्व स्टाफ पंढरपुरात उपस्थित राहून वारकऱ्यांना सेवा देणार आहेत.
या विभागातून सोडण्यात येणार जादा बस -
राज्यातील एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून 1 हजार 97 बस, पुणे विभागातून 1 हजार 80 बस, नाशिक विभागातून 692, अमरावती विभागातून 533, मुंबई विभागातून 212, नागपूर विभागातून 190 ज्यादा बसेस या एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.