सोलापुर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. मात्र, काही परमिट बार चालक हे घरीच दारूचा साठा करून त्याची अव्वाच्या सव्वा भावात विक्री करत असल्याचे समोर आले आहे. विडी घरकुल परिसरात एक परमिट बार चालकाच्या घरामधून देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
महेश गुरुनाथ पवार ( मड्डी वस्ती, सोलापूर), गुरुनाथ गेंनप्पा पवार (मड्डी वस्ती, सोलापुर), सचिन विठ्ठल आंदोडगी(कुंभारी दक्षिण, सोलापुर) यांच्याविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानंद आंदोडगी यांचे कुंभारी गावाच्या परिसरात शांभवी नावाचे परमिट बार आहे. लॉकडाऊन असल्याने अनेक दिवसांपासून परमिट बार व हॉटेल बंदच आहेत. त्यामुळे शिवानंद आंदोडगी याने देशी विदेशी मद्यांचा घरातच साठा केला होता. पोलीस उपनिरीक्षक अजय हांचाटे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना यासंदर्भात माहिती मिळाली.
त्यानंतर लागलीच सदर ठिकणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना मॅकडोल नंबर-1, सागर सम्राट, इम्पीरियल ब्लू या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. एकूण 266 बाटल्या असा 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सदर कामगिरी सब इन्स्पेक्टर अजय हांचाटे, हेड कॉन्स्टेबल युनूस सय्यद, पोलीस नाईक हरिदास पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित थोरात, शहाजहान शेख आणि वाळूजकर यांनी केली