सोलापूर - आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुंदर व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 29 हजार स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा बरोबरच स्वच्छतेला अधिक महत्व देण्यात आले आहे. वारकऱ्यांची स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी पंढरपूर शहरात विविध भागात सुमारे 29 हजार स्वच्छता गृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आषाढीवारी पूर्वीच शहरात महास्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरात वारीकाळात स्वच्छता राहावी यासाठी पालिकेचे सुमारे 1 हजार 600 कर्मचारी स्वच्छता दूत म्हणून सेवा करणार आहेत.
आषाढी सोहळ्साठी राज्यभरातून जवळपास 10 ते 12 लाख भाविक पंढरीत येतील अशी शक्यता गृहीत धरून प्रशासनाने स्वच्छता गृहांची सोय केली आहे. यासाठी शहरातील खासगी स्वच्छता गृहांचाही वापर केला जाणार आहे. दरवर्षी फॅब्रिकेटच्या तात्पुरत्या स्वच्छता गृहांचा मोठा वापर केला जातो. मागील २ वर्षापासून शहरातील विविध भागात पाच ते सहा ठिकाणी कायम स्वरुपी सुलभ शौचालये बांधण्यात आली आहे. या शौचालयांचा इतर काळात देखील चांगला वापर होत आहे.
ही शौचालये एसटीबस स्थानक, चंद्रभागा बसस्थानक, पत्रशेड, गोपाळपूर रोड, बाजार समिती या ठिकाणी प्रशस्त अशी सुलभ शौचालये उभारली आहेत. या शिवाय शहरातील विविध मठ, चंद्रभागानदी, 65 एकर परिसर, पत्राशेड, गोपाळपूर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी, दर्शन मंडप, तुकारामभवन आदीसह शहरातील उपनगरात देखील तात्पुरत्या स्वच्छता गृहांची सोय केली आहे.
स्वच्छता गृहांचा वापर वाढावा यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले आहे. शिवाय प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती देखील केली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. वारीसाठी येणार्या वारकर्यांनी स्वच्छता गृहांचा वापर करावा असे आवाहन ही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.