पंढरपूर (सोलापूर)- पंढरपुरात पेपर टाकून, काबाड कष्ट करत इंजिनिअर झालेल्या तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुभम भोसले असे त्याचे नाव आहे. तो एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. मात्र अवघ्या 24 व्या वर्षी कोरोनामुळे सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
काबाडकष्ट करून पूर्ण केले शिक्षण-
पंढरपूर येथील कष्टकरी भोसले कुटुंबात शुभमचा जन्म झाला. लहानपणापासूनच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शुभमही वडिलांसह कष्ट करून शिक्षण घेत होता. शुभम हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता, त्याला शिकण्याची फार आवड होती. शुभमचा दिनक्रम हा पहाटे चार वाजल्यापासून सुरू होत असे. शुभमचे वडील सोमनाथ भोसले हे पंढरपूर येथील वृत्त पेपर विक्रेते होते. त्यामुळे शुभमलाही पहाटे चार वाजता उठून पेपर वाटायला जावे लागे. याच कष्टाच्या जोरावर त्याने बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतला. पुढे त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली.
नामवंत अशा टीसीएस कंपनीत नोकरी लागली...
शुभमने सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी घेतली, त्याने वडिलांच्या कष्टाचे चीज केले होते. त्यानंतर त्याला कोलकत्ता येथील टीसीएस कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. त्यामुळे भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या महामारीतही शुभम हा कोलकात्यात काम करत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शुभमचा साखरपुडाही ठरवून लग्न निश्चित करण्यात आले होते.
शुभमचा कोरोनामुळे मृत्यू-
भोसले कुटुंबात सर्व काही चांगले चालले असताना शुभमला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्याला पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शुभमला कोरोनाचा वाढता त्रास लक्षात घेता त्याला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र 28 एप्रिलच्या पहाटे कोरोना विषाणूने त्याचा जीव घेतला. शुभमच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.