सोलापूर - मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा नीरा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. अकलूज येथील शक्ती गवळी (वय - 16) आणि करण लांडगे (वय -14, दोन्ही रा. अकलूज) अशी मृतांची नावे आहेत.
शनिवारी दुपारी अकलूज येथील महर्षि कॉलनी परिसरातील शक्ती चंद्रकांत गवळी, करण रणजित लांडगे, अवधुत हिरा कांबळे (वय - 15) आणि भैया जगन खंडागळे (वय - 16) हे मित्र शनिवारी दुपारी निरा नदीच्या पात्रात पोहण्यास गेले होते. घाटापासून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शक्ती गवळी आणि करण लांडगे हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अवधुत कांबळे व भैया खंडागळे यांनी केला. मात्र, पाण्याचा प्रभाव अधिक असल्याने दोघे पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी पात्रातून बाहेर येऊन घरी फोन लावल्यानंतर महर्षिनगर परिसरातील अनेक तरूणांनी लगेच नीरा नदीच्या घाटाकडे धाव घेतली.
तरुणांनी पाण्यामध्ये त्यांचा शोध घेतला असता, दोघेजण मृत अवस्थेत सापडले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.