सोलापूर - मंगळवेढा तालुक्यात २०१५ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे 2021 या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीतील १६ ग्रामपंचायतीमधील १४४ उमेदवारांना निवडणूक लढवण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.
नवीन उमेदवार शोधण्यात भर
सरपंच पदाचे आरक्षण पुढे ढकलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साह कमी झाला असला, तरी आगामी काळातील पोटनिवडणूक, तालुक्यातील मोठ्या सहकारी संस्थेची निवडणूक पाहाता ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असावे या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी वेगात सुरू आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदरवारांच्या यादीमुळे गावगाड्यातील नेतेमंडळींना या यादीतील उमेदवार वगळून नवीन उमेदवार शोधण्यासाठी आणखीनच गोची झाली आहे. त्यामुळे, नवीन उमेदवार शोधण्यामध्ये नेतेमंडळी गुंतले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नव्याने उमेदवार मिळणार आहेत.
निवडणुकीचा खर्च देणे बंधनकारक
मंगळवेढा तालुक्यात २०१५ साली ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक कार्यालयात वेळेत सादर करणे उमेदवारास आवश्यक होते. परंतु, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपल्या निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास वेळेत सादर केलेला नाही. त्यामुळे, अपात्र केलेल्या १४४ पैकी १४३ उमेदवारांना सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराने आपल्या खर्चाचे विवरण तात्काळ देणे बंधनकारक आहे.
गावनिहाय सदस्य संख्या :
मरवडे २२, सिद्धापूर २, कचरेवाडी ३, लेंडवेचिंचाळे १३, माचनूर ९, गणेशवाडी ८, लवंगी २०, बोराळे ३, घरनिकी २, भोसे १०, सलगर बुद्रुक २१, तांडोर ७, गुंजेगाव १, लमाण तांडा १४, आसबेवाडी ७, नंदेश्वर ४ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.