सोलापूर - कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणाऱ्या 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व कर्मचारी अश्विनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51-ब,57 ,269, 336 यानुसार सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे धनराज पांडे यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात खासगी दवाखाने बंद राहिल्याने रुग्णांना सेवा मिळाली नाही. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलवरही ताण आला होता. दरम्यान यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल आणि धनराज गिरजी हॉस्पिटल हे खास कोविड रुग्णांवर उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत. मात्र, या रुग्णालयांमधील काही डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, सेवक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. हे जर रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कामावर हजर राहिले नाहीत, तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोविड रुग्णांवर उपचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले पाहिजे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात हयगय करु नये, काही समस्या असल्यास त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील, असेही पांडे यांनी सांगितले.
सोलापुरातील खाजगी डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात दवाखाने बंद ठेवले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक रुग्णाचे यामुळे हाल झाले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने तिघांचा जीव गेल्याच्या घटना देखील सोलापूरात घडल्या आहेत. रुग्णालये उघडली नाही तर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितल्यावर रुग्णालय उघडली मात्र उपचार सुरू करण्यात आले नव्हते. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिल्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला होता. कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील म्हणून एका रुग्णालयाने सुसज्ज असे 20 बेडचे आयसीयूच चक्क बंद ठेवलेले आढळले होते.
दरम्यान, वारंवार सूचना देऊन देखील कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दर्शविल्याने, होटगी रोडवरील 'युगंधर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'वर सोलापूर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबतच, पुढील काळामध्ये कोविड-19 रुग्णावर उपचारास नकार देणाऱ्यावर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही धनराज पांडे यांनी यावेळी दिली होती.
हेही वाचा : ...अन्यथा पुन्हा वाहन जप्ती अन् दुकाने सील करू, पोलीस आयुक्त शिंदे यांचा इशारा