सोलापूर (पंढरपूर) - सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम सुरूच आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात 1 हजार 91 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यात पंढरपूर, माढा, माळशिरस, बार्शी तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. माढा तालुक्यात 198 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. आज (मंगळवार) जिल्ह्यामध्ये 691 कोरोनाबाधित बरे झाले.
पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा तालुक्यात कोरोनाचा स्फोट -
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा तालुक्यात कोरोना विषाणूचा अक्षरश: स्फोट झाला आहे. माढा तालुक्यामध्ये एकाच दिवशी 198 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, बार्शी तालुक्यात प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बार्शी शहर व तालुक्यात 126 नवीन कोरोनाग्रस्त तर पंढरपूर शहर व तालुक्यात 174 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. माळशिरस तालुक्यात 187 जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यात 7 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरू -
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 7 हजार 755 इतकी आहे. या रुग्णांवर जिल्ह्यातील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार दिले जात आहेत. रूग्णांना योग्य ते उपचार दिले जात आहेत. माढा व माळशिरस तालुक्यामध्ये सर्वाधिक दीड हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, त्याखालोखाल पंढरपूर तालुक्यांमध्ये 1 हजार 200 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.