सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे. बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचे वेतन देऊन 10 लाख 2 हजार 58 रुपये रकमेचा धनादेश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो कुटुंबाचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असल्याने, मदत कार्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनासोबतच आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन सोलापूर सोशल फाउंडेशनने सांगली जिल्ह्यातील हरिपूर व कोल्हापूर मधील चांदुर ही गावे दत्तक घेतली आहेत.
तसेच मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्थांच्या माध्यमातून आजपर्यंत 33 गावे पुनर्वसनासाठी दत्तक घेण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा 1 दिवसाचा पगार हा पूरग्रस्त भागाच्या पूर्नवसनासाठी दिला आहे. हा 10 लाखाचा धनादेश सुभाष देशमुख यांच्याकडे देत असताना बँकेचे प्रशासक शैलेश कोथिंबीरे, व्यवस्थापक के. आर. पाटील, अधिकारी गोटे आदी उपस्थित होते.