सिंधुदुर्ग - महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना अधिवेशन जवळ आल्यावरच कोरोना कसा झाला, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. हा कोविड 19चा कोरोना नसून राजकीय कोरोना असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. तसेच हिंदूंविरोधी असलेला सामना वाचणे आम्ही केव्हाच बंद केले असे म्हणून याबाबत आपण लवकरच डब्ल्यूएचओला संशोधनासाठी पत्र लिहणार असल्याचेही उपरोधितपणे म्हणाले आहेत.
हिंदूंविरोधी सामना वाचणे बंद केले
हिंदूंविरोधी असलेला सामना वाचणे आम्ही केव्हाच बंद केले, असे विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचला आता वेगळ्या प्रकारचा सामना वाचायला भेटतोय. सामना वृत्तपत्रात छापलेल्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा मग राम मंदिरासाठी निधी गोळा करा यावर नितेश राणे बोलत होते.
कोविड 19चा कोरोना नसून राजकीय कोरोना
आमदार नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना आणि अधिवेशन मुद्द्यावरून सरकारवर चांगलेच आसूड ओढले. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना अधिवेशन जवळ आल्यावरच कोरोना कसा झाला, असा सवाल उपस्थित केला. तसेच हा कोविड 19चा कोरोना नसून राजकीय कोरोना असल्याचा अंदाज व्यक्त करून यासंदर्भात डब्ल्यूएचओला पत्र लिहून संशोधन करण्यासाठी सांगणार असल्याचे सांगितले.
अधिवेशनाच्या तोंडावर वाढलेल्या कोरोनाचे संशोधन हवे
राज्य सरकारकडून 1 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर करण्यात आले आहे. मात्र गेल्या दहा दिवसात राज्यात अचानक वाढलेला कोरोना व त्यानंतर गेले वर्षभरात ज्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाही त्या मंत्र्यांनाही लागोपाठ होत असलेला कोरोना पाहता हा राजकीय तर कोरोना नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. मध्यंतरी वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोनाची लागण होत असल्याचे पुढे आले. आता अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना होत असलेला कोरोना हा नेमका कोणत्या प्रकारात येतो त्याचे संशोधन करावे अशी मागणी जागतिक आरोग्य संघटनेकडे करण्यात येणार असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.