सिंधुदुर्ग - जिल्ह्यात लॉकडाऊन काळात सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता पाणी टंचाईच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आली असून जिल्ह्यातील 47 गावांमधील टंचाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यातील शहरी भागात आणि धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या वाडय़ा- वस्त्यांमध्ये उन्हाळय़ात पाण्याची टंचाई जाणवते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विहीर खोदणे, विंधन विहीर, विहीर दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर खोल करणे, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती अशाप्रकारची कामे हाती घेण्यात येतात. लॉकडाऊनच्या काळात ही कामे करणे शक्य होत नव्हते. आता मात्र, उन्हाळ्य़ात जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा विचार करता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाईच्या कामांना सुरुवात करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील 47 गावांमधील कामांना सुरुवात झाली आहे. या कामांमध्ये 33 विंधन विहीर दुरुस्ती, 13 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती आणि एक पूरक नळपाणी योजनेचा समावेश आहे. यातील नऊ गावांमधील विंधन विहीर दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. तर 56 गावांमधील 42 विंधन विहीर दुरुस्ती, 13 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती आणि एक पूरक नळ पाणी योजना उभारणीच्या कामांना सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 120 कामे निविदा प्रक्रियेत असून त्यामध्ये 35 विंधन विहीर दुरुस्ती, 81 नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, चार पूरक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.
शहरी भागात पुरेसे पाणी उपलब्ध -
शहरी भागातील पाणी पुरवठय़ाची परिस्थिती चांगली असून सध्या जिल्हय़ातील आठ नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये सावंतवाडीला पाणीपुरवठा करणाऱया पाळणेकोंड धरण आणि केसरी पाणीपुरवठा योजनेत 12 मीटर पाणीसाठा आहे. मालवण येथे धामापूर नळपाणी योजनेमध्ये 0.941 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 38 टक्के पाणीसाठा आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेच्या निशान तलावात एक मीटर पाणीसाठा आहे. सध्या वेंगुर्ले शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कणकली नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये 11 मीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. कुडाळ पाणीपुरवठा योजनेतील पावशी तलावात बारमाही पाणी उपलब्ध आहे. कसई-दोडामार्गला पाणीपुरवठा करणाऱया मणेरी नदीमध्ये तिलारी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वैभववाडी येथेही नळपाणी पुरवठा योजनेसाठी पाणीसाठी बारमाही आहे. देवगडा जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱया स्रोताच्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध असून उन्हाळा अखेरपर्यंत उपलब्ध पाण्याचा शहरात पुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने योग्य नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये असा आहे पाणीसाठा -
जिल्हय़ातील महत्त्वाच्या धरणांमध्ये तसेच लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 24 एप्रिलला पुढीलप्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. तिलारी 273.572 दस लक्ष घन मीटर म्हणजेच 61.15 टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम पाटबंधारे प्रकल्प असलेल्या देवघर प्रकल्पात 41.545 द.ल.घ.मी. म्हणजेच 42.38 टक्के, कोर्ले सातांडीमध्ये 23.642 द.ल.घ.मी. म्हणजेच 92.48 टक्के, अरुणा प्रकल्पात 20.790 द.ल.घ.मी. म्हणजेच 22.59 टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्हय़ातील सर्व लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये मिळून 48.02 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.