सिंधुदुर्ग - तौक्ते वादळानंतर जिल्ह्यात नव्या संकटाने दार वाजवले आहे. जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची 2 पथके तैनात करण्यात आली आहेत.
वेंगुर्लेतील 66 कुटुंबांना स्थलांतरणाचे आदेश
हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 ते 15 जून दरम्यान, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व विभागांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, वेंगुर्ले येथील 66 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवार व रविवारी मुख्यालय न सोडण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. 'ढगफुटी लक्षात घेता आवश्यक ते नियोजन करावे. तर 12 व 13 जून या सुट्टीच्या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडू नये. शोध व बचावाची सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. प्रत्येक विभागाने अतिवृष्टीबाबत मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने तसेच पूर्ण मान्सून कालावधीसाठी आपल्या विभागाचा संपर्क अधिकारी नियुक्त करावा. त्याचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून द्यावा. सर्व विभाग, कार्यालय प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयात हजर राहावे. आपल्या अधिनस्थ यंत्रणेलाही तसे आदेश देण्यात यावेत', असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी म्हटले आहे.
एनडीआरएफ पथक मालवण, सावंतवाडीत तैनात
येत्या 3 दिवसात होण्याऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडीमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तर दुसरी टीम मालवणमध्ये तैनात करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यात यापूर्वीच्या भूस्खलन व पूरस्थितीमध्ये ज्या गावांची खबरदारी घेतली होती; त्या शिरशिंगे, असनिये, झोळंबे तसेच बांदा शहर अशा भागाबाबत पाहणी करून खबरदारी घेतली जाणार आहे, असे एनडीआरएफ पथकाने सांगितले आहे. दरम्यान, मालवणमध्ये तौक्ते वादळाचा फटका बसला. त्यामुळे दुसरी टीम मालवणमध्ये तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा - विनायक मेटे मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाहीत, बाळासाहेब थोरातांचा पलटवार