सिंधुदुर्ग - जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कणकवली शहरातील सोनगेवाडी येथे संरक्षक भिंत कोसळल्याची घटना सकाळी 7 च्या सुमारास घडली. यामध्ये भिंती खाली 8 वाहने दबली गेली असून 2 लाख 96 हजारांचे नुकसान झाले आहे.
रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा शहरातील सोनगेवाडीला बसला. येथील लक्ष्मण अपार्टमेंटलगत असलेल्या शिवराम पवार यांच्या घरालगतची 25 ते 30 फुटाची संरक्षक भिंत शेजारी सुरेश ओटवणेकर यांच्या घरावर तसेच लक्ष्मण अपार्टमेंटमधील पार्किंग भागात कोसळली. यात ओटवणेकर यांच्या घराचे सुमारे 68 हजाराचे नुकसान झाले आहे.
लक्ष्मण अपार्टमेंटमधील नीलेश मसुरकर, रूकाराम प्रजापती, भैरव राठोड, आब्दुलमजीद फुलारे, संतोष राणे, मिलिंद सावंत आणि महेंद्र सावंत यांच्या दुचाक्या ढिगार्याखाली दबल्या गेल्या. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.