सिंधुदुर्ग - नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे. बुडत्याला काढीचा आधार असं म्हणत विनायक राऊत यांची नारायण राणेंना कोपरखळी मारली आहे. तसेच नाॅन मॅट्रीक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गचे दुर्दैव असेल राऊत म्हणाले
बुडत्याला काढीचा आधार -
एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे सारख्या एका नाॅन मॅट्रीक माणसाला केंद्रात मंत्रीपद देण्याची वेळ आली तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी थेट टीका करत विनायक राऊत यांनी नारायण राणेंना डिवचलं आहे. तसेच बुडत्याला काढीचा आधार असं म्हणत राणेंना कोपरखळी लगावली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत अमित शाह यांनी केले होते सूचक विधान - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज उद्धघाटन प्रसंगी तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला होता. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.
राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा -दरम्यान अमित शाह यांनी राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात जोर चढला आहे. राजकीय क्षेत्रात देखील चर्चाना उधाण आले असून भाजपच्या गोटातूनही ही बातमी विश्वसनीय असल्याचे सांगितले जात आहे. याच वृत्तावरून खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.