सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत अनेक समस्या कायम आहेत. कणकवलीत उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. तर ज्या ठिकाणी बॉक्सवेल कोसळला आहे. त्या ठिकाणी वाय आकाराचे उड्डाणपूल उभारले पाहिजे. केंद्राकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे अधिक चाळीस कोटी मंजूर होण्यासाठी लागणारी मदत आम्ही करू. मात्र बॉक्सवेल व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत नव्या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिली दिला.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात शहरातील महामार्ग समस्यांबाबत नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कार्यकारी अभियंता सलीम शेख, दिलीप बिल्डकॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर गौतम कुमार, कन्सल्ट एजन्सी आरटी फॅक्टचे अधिकारी उपस्थित होते. तसेच नगरपंचायत बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, नगरसेवक शिशिर परुळेकर, किशोर राणे, बंडू गांगण उपस्थित होते.
वाय आकाराचा उड्डाणपूल हवा-
कणकवलीत एस. एम. हायस्कूल समोर कोसळलेल्या हायवे पुलाच्या बॉक्सवेलच्या जागी पिलर बेस वाय आकाराचा उड्डाणपूल हवा आहे. केवळ प्लेट लावलात तर आम्ही खपवून घेणार नाही. प्लेट लावायला गेलात तर काम सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
उड्डाणपुल पिढ्यानपिढ्या टिकणारे हवे-
कणकवलीत उड्डाणपुल पिढ्यानपिढ्या टिकणारे हवे आहेत. कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या भागापासून गांगोमंदिरापर्यंत ११० मीटरचे उड्डाणपूल बांधण्यासाठी लागणाऱ्या ४० कोटींच्या निधीसाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी याला मंजुरी देतील. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना इशारा-
या बैठकीत २६ जानेवारीपर्यंत उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन असल्याचे गौतम यांनी सांगितले. त्यावेळी राणे यांच्यासह सर्वांनीच या प्रस्तावाला विरोध केला. अपूर्ण काम असताना उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू करू नका. जोपर्यंत कणकवली शहरातील नागरिकांचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असे राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू -
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, शहरात होणाऱ्या उड्डाणपूल कामात काही तांत्रिक अडचणी आहेत. स्थानिकांच्या काही मागण्या आहेत. त्यासंदर्भात आमची आज बैठक झाली. या पुलाच्या कोसळलेल्या भागावर प्लेट लागणार नाहीत, अशी आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. बॉक्सवेल च्या ठिकाणी पूर्ण उड्डाणपूल व्हावे. ही आमची मागणी आहे. त्यासाठी खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
पाणी पाइपलाइनचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करू-
तसेच नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, की कणकवली शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन ४ ठिकाणी बदलून हव्यात आहेत. याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले. तरी अद्याप काम केले नाही. पाणी पाइपलाइनचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता शेख यांनी दिले आहे.
भूसंपादन न झाल्यामुळे पटवर्धन चौकात अद्याप आरओडब्ल्यू लाईन निश्चित झाली नाही. ती तातडीने करावी. पटवर्धन चौक ते एसटी स्टँड दरम्यान सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे, फ्लायओव्हरचे बांधकाम झालेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावा, अशा मागण्या समीर नलावडे यांनी या बैठकीत केल्या.
हेही वाचा- 'महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील'
हेही वाचा- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण; रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर 17 डिसेंबरला सुनावणी